राज ठाकरेंच्या सभेमुळे मोहोळ यांची विजयाकडे वाटचाल!

पुणे लोकसभेची राजकीय गणिते बदलली

पुणेः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी राजकीय भाष्य करत अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळली. अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, शरद पवारांसोबत राहूनही त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या सभेचे फलीत म्हणून की काय मुरलीधर आण्णा मोहोळांची राजकीय ताकत वाढली. परिणामी त्यांची आता विजयाकडे वाटचाल सुरु झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

पुणेकरांची मुरलीअण्णांच पसंत…
पुण्याची पसंद, मोरे वसंत अशी टॅगलाईन घेऊन लोकसभा निवडणूका जाहीर झाल्यापासून वसंत मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार सुरू केला होता. सुरुवातीला त्यांना उत्तम प्रतिसाददेखील मिळाला होता. मात्र ऐन मतदानाच्या तोंडावर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारारासाठी राज ठाकरे यांची रेकॉर्ड ब्रेक सभा झाल्यामुळे क्षणार्धात पुण्याच्या राजकारणाची गणितेच बदलली आहेत. वसंत मोरेंना मनसेचे मानणारे कार्यकर्तेही मुरलीधर मोहोळ यांच्याकडे वळले आहेत. त्यामुळे मोहोळ यांचे पारडे आपोआप जड झाले असून, त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचेही बोलले जात आहे.

तिरंगी लढतीची हवा गुल
पुण्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना सुरुवातीला रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये तगडी लढत होणार होती मात्र वसंत मोरे हे वंचितकडून मैदानात उतरल्याने ही लढत तिहेरी होईल असे भाकीत केले जात होते. कारण तिघेही पुण्याचे तगडे उमेदवार आहेत. तिघांचाही दांडगा संपर्क आहे. युतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी ही तिरंगी लढत होणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. त्यात काल राज ठाकरे यांच्या सभेमुळे तिरंगी लढतीची हवाच गुल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कारण मोरे यांना पाठिंबा देणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचे मन वळविण्यात राज ठाकरे यशस्वी झाले आहेत. शहरात अजूनही मनसेची ताकद आहे. त्यात आता मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी मोहोळ यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

देशाचे भविष्य ठरवणारी निवडणूकःमुरलीधर मोहोळ
प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीने धाकधूक वाढली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना मोहोळ म्हणाले, अगदी सर्व सामान्य माणसाला, ज्याला या विषयात थोडं कळतं तो सुद्धा सांगेल की एका विधानसभेची पोटनिवडणूक आणि लोकसभेची निवडणूक याचा एकमेकांशी संदर्भ लावण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ही निवडणूक देशाचे नेतृत्व कोणी केले पाहिजे?, देश कोणी चालवला पाहिजे?, कुठल्या नेतृत्वाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील?, कोणाच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होईल आणि देश पुढे जाईल? भारताला महासत्ताक देश म्हणून बनविण्याची क्षमता कोणामध्ये आहे? या सर्व गोष्टींचा विचार करूनच लोक मतदान करतात आणि करतील. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीसारख्या छोट्या निवडणुकीचे संदर्भ कुठे लागू होत नसतात. लोकसभेची निवडणूक मोठी आहे आणि देशाचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे मला या गोष्टीचं काही वाटत नाही.

 

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.