लोकसभा 2024: आरोप-प्रत्यारोप… ब्रिटीशांना घालवले, मोदी क्या चीज हैः शरद पवार

पुणे : ‘एकेकाळी या देशामध्ये साम्राज्याचा सूर्य मावळत नव्हता, अशा ब्रिटिशांना देशातून घालवण्यासाठी महात्मा गांधींच्या विचाराने कोट्यवधी लोक एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांना देशाबाहेर घालवले. मग, मोदी काय चीज आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

‘कमकुवत झाल्यावर पवार काँग्रेसमध्ये’
शरद पवार यांचा पक्ष कमकुवत होतो, तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि नंतर परिस्थिती भक्कम झाल्यावर ते पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात, हेच पवार यांचे राजकारण राहिले आहे,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पवार यांना लक्ष्य केले. बारामतीच्या निवडणुकीत पराभव होणार याची कल्पना आल्यानंतर पवार यांची भूमिका बदलल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात त्यांनी पवार यांच्यावर टीका केली.

राज्यात ११ मतदारसंघात प्रचार संपला
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत शनिवारी प्रचाराची सांगता झाली. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सभा, प्रचारफेऱ्या, दुचाकी रॅली, रोड शो आदी माध्यमांतून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, शिर्डी, बीड आणि अहमदनगर या मतदारसंघांतील प्रचाराचा धुराळा शांत झाला.

देशातील ९६ मतदारसंघांचा समावेश
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील दहा राज्यांतील ९६ मतदारसंघांत सोमवारी (१३ मे) मतदान होणार आहे. तिथे शनिवारी प्रचाराची सांगता झाली. याशिवाय आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचीही शनिवारी सांगता झाली. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अखिलेश यादव (कनौज, उत्तर प्रदेश), केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह (बेगुसराय, बिहार), नित्यानंद राय (उज्जरपूर, बिहार), काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी (बहरामपूर, प. बंगाल), एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वाय. एस. शर्मिला आदी नेते रिंगणात आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.